केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी घेतला विमान चालवण्याचा अनुभव

Share

पुणे (प्रतिनिधी) बाणेर येथील यो स्काईज एव्हीएशन इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या एअरबस ए३२० फ्लाइट सिम्युलेटरचे उदघाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अत्याधुनिक सिम्युलेटरवरून विमान चालवण्याचा अनुभव घेतला.

उद्घाटनप्रसंगी मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः या सिम्युलेटरवर आभासी पद्धतीने “मुंबई विमानतळावरून एअरबस ए ३२० उडवण्याचा अनुभव घेतला आणि तो अनुभव अत्यंत आनंददायी व वास्तविकतेचा असल्यासारखा भास झाला, असे सांगितले. त्यांनी सिम्युलेटरमधील यथार्थपणा, प्रशिक्षणक्षमता आणि भारतीय तरुण अभियंत्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.

या प्रसंगी यो स्काईजचे संस्थापक संचालक स्क्वॉड्रन लीडर (नि.) अजय परांजपे आणि संचालिका कॅप्टन तृप्ती कर्नावट यांनी सिम्युलेटरविषयी सविस्तर माहिती मान्यवरांना दिली.

यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल, जीतो अपेक्सचे अध्यक्ष विजय भंडारी, बडेकर ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण बडेकर, जीतो अपेक्सचे संचालक राजेंद्र जैन ,उद्योजक राजेंद्र मुथा, चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मोतीलाल सांकला, सनी सांकला, सुनील नहार, जे डब्ल्यु चे संचालक उमेश जोशी,एमआयटीचे उपकुलगुरू डॉ. रवी चिटणीस,पीव्हीजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. मनोज तरांबळे,यो स्काईजचे संस्थापक संचालक स्क्वॉड्रन लीडर (नि.) अजय परांजपे आणि संचालिका कॅप्टन तृप्ती कर्नावट आदी मान्यवर उपस्थित होते.

यो स्काईज संस्थेने मंत्री महोदयांना विनंती केली की, सिम्युलेटरवर आधारित प्रशिक्षण प्रत्येक विद्यार्थी पायलटसाठी अभ्यासक्रमाचा अनिवार्य भाग असावा. यावर श्री मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, ते नक्कीच याकडे गांभीर्याने पाहतील.

या वेळी बोलताना श्री. गोयल म्हणाले, “भारत आज प्रगतीच्या मार्गावर आहे. पारंपरिक क्षेत्रांपुरते मर्यादित न राहता, आता महिला वैमानिक बनून आकाशात झेप घेत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.” त्यांनी कॅप्टन कर्नावट यांचे विशेष कौतुक केले.

श्री. भंडारी यांनी सांगितले, “कॅप्टन तृप्ती कर्नावट यांनी अमेरिकेत उड्डाण करून समाजाचे आणि देशाचे नाव उज्वल केले आहे. त्यांच्या पंखांना बळ देण्याचे कार्य पुरुष करत आहेत, हे अत्यंत प्रेरणादायी आहे. नवीन पिढीला योग्य दिशा दिल्यास ते अशक्य ते शक्य करून दाखवतील.”
अजय परांजपे म्हणाले कि, हा सिम्युलेटर संपूर्णतः स्वदेशी पद्धतीने डिझाइन केल्यामुळे त्याचा उत्पादन खर्च आयात केलेल्या सिम्युलेटरच्या तुलनेत ७५% नी कमी आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनाही अत्यंत माफक दरात हा विमान चालवण्याचा अद्वितीय अनुभव घेता येतो.हा सिम्युलेटर पूर्णतः भारतीय अभियंत्यांनी डिझाइन आणि तयार केला असून, यो स्काईजच्या टीमने तो विकसित केला आहे.

कॅप्टन तृप्ती कर्नावट म्हणाल्या की, याच सिम्युलेटरच्या सहाय्याने त्यांनी जगातील सर्वात कमी वयाच्या पायलटला स्टुडन्ट पायलट लायसन्स (SPL) मिळवून दिला. त्या काळात अमेरिकेच्या नियमांमुळे विद्यार्थ्याला तिथे उड्डाण करता येत नव्हते, त्यामुळे त्याला कॅनडामध्ये नेऊन केवळ सिम्युलेटरवर घेतलेल्या प्रशिक्षणाच्या आधारे त्यांनी जागतिक विक्रम घडवून आणता आला. असा अनुभव कथन केला.

या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उद्योजक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख, आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी यांनी यो स्काईजच्या या प्रयत्नाचे व सिम्युलेटरच्या प्रशिक्षणमूल्याचे मुक्तहस्ते कौतुक केले.