पिंपरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे समाजातील वंचित, पीडित, शोषित, कष्टकऱ्यांचे आर्थिक स्वावलंबन झाल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकणार नाही. यासाठी सामाजिक, राजकीय भागीदारीसोबतच मागास घटकांची आर्थिक प्रगती करणे गरजेचे आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मागासवर्गीय घटकांना जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या महिला कार्यकर्त्यांना वाहनांसाठी आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग पिंपरी – चिंचवड शहर जिल्हा आयोजित महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार अण्णा बनसोडे यांचा सत्कार व राज्यस्तरीय कार्यकर्ता संवाद मेळावा चिंचवड स्टेशन येथे पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजय औसरमल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनिल मगरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब करडक यांच्यासह राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहेल, पिंपरी – चिंचवड सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संजय औसरमल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख, ज्ञानेश्वर कांबळे, मा. नगरसेवक निलेश पांढरकर, असंघटित शहराध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, ज्ञानेश्वर मोरे, कुमार कांबळे, यश बोथ, मीरा कांबळे, सागर कसबे, आकाश कडलक स्मिता मसुरे, नितीन अडसूळ, अनिल औसरमल, लॉरेन्स साळवे, प्रकाश दाभाडे, विजू पोटे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे बोलत होते.
अण्णा बनसोडे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानामुळेच माझ्यासारखा कार्यकर्ता विधानसभा उपाध्यक्ष पदासारख्या संवैधानिक पदावर पोहचू शकला. डॉ. आंबेडकरांचे स्वप्न होते की देशातील प्रत्येक व्यक्तीला सर्व अधिकार समान मिळाले पाहिजेत. एवढेच नव्हे तर समाजातील शेवटच्या व्यक्तीला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हक्क आणि प्रगती करता आली पाहिजे. या पदाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील. खासकरून समाजातील मागासवर्गीय घटकांना आणि महिलांना मदतीचा हात देण्याचा मनोदय आहे. राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या महिला कार्यकर्त्यांना वाहनांसाठी आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मागासवर्गीय घटकांसाठी औद्योगिक सहकारी संस्थांना निधीसाठी मी प्रयत्न करेन. रमाई घरकुल योजनेंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील घरकुलासाठी मिळणारी रक्कम वाढली पाहिजे यासाठी माझ्याकडून पाठपुरावा केला जाईल. सोबतच, बार्टी, आर्टी अशा संस्थांसोबतच महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, विभागाचे शहरप्रमुख संजय औसरमल आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहेल यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.